जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा, धनंजय मुंडे यांची मागणी

Foto
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलयांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचे काम केले. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाली. भाऊबीजेच्या दिवशी ही बैठक झाली होती, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. आता मनोज जरांगे यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत माजी आणि जरांगे यांची ब्रेन टेस्ट करा, या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. 

धनंजय मुंडे म्हणाले की, गेली 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अण्णांनी जात पात पाहायची नाही, असे शिकवले. मी आजवर कधीही जात पाहून काम केले नाही. मी माझ्या पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असा ठराव मी मांडला. मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात मी सहभागी होतो. लोकसभा निवडणुकीनंतर जरांगे यांच्या आंदोलनासाठी मी परळीत मदत केली. मेटे, संभाजी महाराज यांच्यासोबत मी आरक्षणासाठी काम केले. 
 
जरांगेंना वाटतंय, धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावेत

मी 5 वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून मी काम केले. त्यावेळी मी मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद केले. नगर जिल्ह्यात कोपर्डीला मी पहिली भेट दिली. यावेळी मी आरोपी अटक होईपर्यंत सभागृह चालू दिले नाही. 80 हजार कुणबी प्रमाणात बीड जिल्ह्यात वाटले. मी मनोज जरांगे यांचे उपोषण देखील सोडवले आहे. 17 तारखेची सभा सोडली तर मी एकदाही त्यांच्यावर कधीही आरोप केले नाहीत. मनोज जरांगे यांना वाटते की, धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावेत. मराठा समाजाला ओबीसी की ईडब्ल्यूएसमधून फायदा आहे याचे उत्तर आतापर्यंत जरांगे यांनी दिले नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले. 

माझी अन् जरांगेंची ब्रेन मॅपिंग टेस्ट करा

धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, आता तयार झालेली पिलावळ कोणाची आहे. आम्हाला कोणीही काही बोलले तरी आम्ही गप्प बसतो. मला तर तलवार घेऊन मारायाला आले होते.  ईडब्ल्यूएस की ओबीसीमध्ये जास्त आरक्षण मिळते हे समोरासमोर येऊन होऊन जाऊ द्या. तुम्ही हाके, वाघमारे यांना मारलं. तुमची मारामारीची प्रवृत्ती आहे. तुम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लाऊ नका, इतकेच आमचे म्हणणे आहे. मी अनेकांना बाजूला जाऊन भेटतो, यातून काय कट रचला जातो? हे सगळे तुमचे कार्यकर्ते आहेत. माझी अशी इमेज तयार केली जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे.  माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा. जरांगे आणि आरोपींचीही करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.